Headlines
Home » जळगाव जिल्हा » मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा मार्ग

मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा मार्ग

रोटरी जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनचा पुढाकार

वैजापूर l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क

वैजापूर ता.चोपडा ( प्रतिनिधी ): मोहफुलांचा वापर केवळ मद्यनिर्मितीसाठी न करता, त्यापासून पौष्टिक अन्नपदार्थ बनवल्यास महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आदिवासी विकास विभाग (यावल) चे सहायक प्रकल्पाधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैजापूर येथे आयोजित ‘मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मिती’ कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यशाळेचे स्वरूप आणि प्रशिक्षण

​या दोन दिवसीय कार्यशाळेत पहिल्याच दिवशी ३८ आदिवासी भगिनींनी सहभाग नोंदवला. यात तज्ज्ञांमार्फत मोहफुलांचा चिवडा, लाडू आणि केक यांसारखे पौष्टिक पदार्थ बनवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे रानमेव्याचे मूल्यवर्धन होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

मान्यवरांचे मार्गदर्शन

सरपंच दत्तर सिंग पावरा: “आतापर्यंत मोहफुलांचा उपयोग फक्त दारूसाठीच होतो असे वाटत होते, मात्र रोटरी आणि गांधीतीर्थच्या पुढाकारामुळे या फुलांमधील पौष्टिकतेची जाणीव झाली.”
विजय शिरसाठ (वनरक्षक): “वनसंपदेचे संवर्धन आणि योग्य कारणासाठी वापर होणे ही काळाची गरज आहे.”
डाॅ. सतिश गोगुलवार: “येथे घेतलेले प्रशिक्षण महिलांनी प्रत्यक्ष व्यवहारात आणावे. तसेच, तयार झालेल्या उत्पादनांना आयोजकांनी चांगली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी.”

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

​कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला सूत अर्पण करून करण्यात आली. प्रशांत सुर्यवंशी यांनी ‘जीवन में कुछ करना है तो हिम्मत हारे मत बैठो…’ हे प्रेरणादायी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुर्यवंशी यांनी केले, तर आभार मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांनी मानले.

व्यासपीठावरील उपस्थिती

यावेळी शालिनीताई, अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, संवाद सचिव पंकज व्यवहारे, विद्याताई, चंद्रकांत चौधरी, अर्जुन प्रसाद, रौनक, सतिश चौरसिया, पायल, अश्विनी, राखी, अभिषेक, वैभव, रजत, जयश्री, आशिक, आयुष, राहुल, युवराज कोळी, बाळू बारेला आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!