पुणे, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील रिकाम्या डब्याला रात्री आग लागली,अग्निशमन दलाच्या जवानांनी आग ३०मिनिटांच्या अथक प्रयत्नांनी आटोक्यात आणली .पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील एका रिकाम्या डब्याला लागलेली ही आग इतकी भीषण होती की, या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
ही घटना १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजून ५८ मिनिटांनी घडली. कॉम्प्रेसर रूम क्रमांक ४ रेल्वेजवळ ही घटना घडली . परिसरात असलेल्या तीन डब्यांपैकी एका डब्याला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून हे डबे या ठिकाणी पडून आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आधी वीजपुरवठा खंडित केला आणि त्यानंतर आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. ३० मिनिटांत आग विझवण्यात आली.
दरम्यान, विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या २० जवानांनी आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसून जळालेल्या एका डब्याचं पुर्ण नुकसान झालं आहे.
