Headlines
Home » जळगाव » आठवडे बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा !

आठवडे बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा !

Jalgaon Food Poisoning: पाणीपुरी हा चटपटीत पदार्थ असल्याने, अनेकांचा तो आवडता पदार्थ आहे. आजकाल खवय्यांची आवडती ही पाणीपुरी गल्लोगल्ली स्टॉल्सवर सहज मिळते. मात्र चोपडा तालुक्यातील कमळगावमध्ये पाणीपुरी खाणे चांगलेच महागात पडले आहे.

चोपडा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा झाली आहे. या ८० जणांमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. चोपडा तालुक्यातील पिंप्री, कमळगाव आणि चांदसणी इथल्या लोकांचा विषबाधितांमध्ये समावेश आहे. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कमळगावमध्ये सोमवारी आठवडे बाजार भरला होता. या बाजारात मितावली, पिंप्री, चांदसणी तसेच आजूबाजूच्या अनेक गावांमधील ग्रामस्थ तिथे बाजारहाटसाठी आले होते. त्यापैकी काही जणांनी बाजारातील पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली. काही जणांनी पाणीपुरीचं पार्सल घरी देखील नेले. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांची तब्येत बिघडली. अनेकांना मंगळवारी उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने पाणीपुरीमुळे ८० जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त असल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान काही रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ३० रुग्णांना जळगाव जिल्हा रुग्णालय, तसेच चोपडामधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याची माहिती सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेची तातडीने दखल घेत आमदार लता सोनवणे यांनी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णांच्या प्रकृतीविषयीची माहिती त्यांनी जाणून घेतली. रुग्णांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नागरिकांनी उघड्यावरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावेत. पावसाळ्यात आपले पोट लवकर बिघडते. डॉक्टरदेखील पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ न खाण्याचा सल्ला देत असतात. पाणीपुरीसारखे पदार्थ सहज रस्त्यावर उपलब्ध होतं असतात. पण ती पाणीपुरी कुठे आणि कशी बनवली जाते, हे बघा आणि मगच खा. पावसाळ्यात बाहेरचा कोणताही पदार्थ खाताना सावधगिरी बाळगा. त्या पदार्थामुळे तुम्हाला तसेच आबालवृद्धांना काही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!