DONALD TRUMP : शपथ ग्रहणापूर्वी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. देशावर आलेल्या प्रत्येक संकटावर तोडगा काढेल असे आश्वस्त केले. माझे पुनरागमन हा ‘ट्रम्प इफेक्ट’ नसून, तुम्ही आहात. तसेच सॉफ्ट बँकेने अब्जावधी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले असल्याचे ट्रम्प म्हणाले.
वॉशिंग्टन ( वास्तव पोस्ट ) : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज सोमवार दि २० रोजी भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. शपथ घेण्यापूर्वी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना आणि देशवासीयांना वचन दिले की ते अमेरिकेसमोरील प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी ते त्वरीत काम करतील.

■ प्रत्येक संकटावर तोडगा काढेन : ट्रम्प
ट्रम्प यांनी ‘कॅपिटल वन एरिना’ स्टेडियममध्ये आपल्या समर्थकांना सांगितले की, “मी जलद आणि मजबूत काम करेन आणि आपल्या देशाला भेडसावणाऱ्या प्रत्येक संकटावर तोडगा काढेन. ट्रम्प यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ‘मेक अमेरिका ग्रेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २०,००० लोकांची क्षमता असलेले स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते, शिवाय कडाक्याच्या थंडीतही स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते.

■ डोनाल्ड ट्रम्प यांचे शानदार पुनरागमन :
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा पराभव करून शानदार पुनरागमन केले आणि चार वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारे ते अमेरिकन इतिहासातील दुसरे व्यक्ती ठरले. ट्रम्प म्हणाले, “तुम्ही असे परिणाम पहात आहात ज्याची अपेक्षा तुम्ही पदभार स्वीकारण्यापूर्वी कोणालाही केली नव्हती. सर्वजण याला ‘ट्रम्प इफेक्ट’ म्हणत आहेत. पण ते तुम्ही (अमेरिकन लोक) आहात. हा तुमचा प्रभाव आहे.”

■ गुंतवणुकीबाबत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य :
ट्रम्प म्हणाले, “सॉफ्टबँकेने १०० अब्ज ते २०० अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.” ही सर्व गुंतवणूक केवळ आम्ही निवडणूक जिंकल्यामुळे केली जात आहे.’ इंडियास्पोरा या जागतिक भारतीय समुदायाच्या ना-नफा संस्थेने सोमवारी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्यापूर्वी त्यांचे अभिनंदन केले आणि आशा व्यक्त केली की यू.एस. नवीन प्रशासनात भारताचे संबंध अधिक दृढ होतील.
