Headlines
Home » क्रीडा » टी-२० महिला आशिया चषकात उपांत्य सामन्यात आज भारतीय महिलांची लढत बांग्लादेशसोबत

टी-२० महिला आशिया चषकात उपांत्य सामन्यात आज भारतीय महिलांची लढत बांग्लादेशसोबत

T-20 Women’s Asia Cup : आशिया चषकात उपांत्य फेरीचा थरार आज होणार आहे. भारतीय महिलां टीम बांग्लादेशशी लढेल तर दुसऱ्या लढतीत पाकिस्तानसमोर श्रीलंकेचे आव्हान असेल. जर श्रीलंका आणि बांग्लादेश आज पराभूत झाले तर फायनल मध्ये भारत पाकिस्तान असा हाय होल्टेज सामना रविवारी पहायला मिळेल.

दाम्बुला ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत धडक मारली असून आज शुक्रवारी दुपारी २ वाजता पहिल्या उपांत्य सामन्यात बांग्लादेशशी गाठ पडेल. तर सायंकाळी दुसऱ्या उपांत्य लढतीत पाकिस्तानसमोर श्रीलंकेचे कडवे आ‌व्हान असेल. आजचे विजेते संघ रविवारी अंतिम सामन्यात जेतेपदासाठी भिडतील.

दरम्यान गेल्या चार हंगांमांपासून टी-२० प्रकारात आशिया चषक खेळवण्यात येत आहे. २०२२मध्ये झालेल्या आशिया चषकात भारतीय संघाने श्रीलंकेला धूळ चारून जेतेपद मिळवले होते. आतापर्यंत ४ वेळा एकदिवसीय, आणि ४ वेळा टी-२० प्रकारात महिलांची ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. त्यापैकी फक्त २०१८ मध्येच भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या प्रकारात एकूण सात वेळा जेतेपद मिळवून भारतीय महिला टीमनेच बाजी मारली आहे.

टी-२० आशिया चषक २०२४ स्पर्धेत अद्याप भारत अपराजित :

भारताने पहिल्या लढतीत पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला ७८ धावांनी धूळ चारली. तिसऱ्या लढतीत नेपाळला ८२ धावांनी नेस्तनाबूत करून भारताने अ-गटातून अग्रस्थानासह आगेकूच केली. दुसरीकडे बांग्लादेशने ब-गटात ३ सामन्यांतील २ विजयांच्या ४ गुणांसह दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी भारत-बांग्लादेश यांच्यातील मालिकेत दोन्ही संघांतील खेळाडूंत पंचांच्या निर्णयावरून वादही झाला होता. त्यामुळे या सामन्याकडे चाहते लक्ष ठेवून आहेत.

टीम इंडियाची फलंदाजीत भिस्त शफाली, स्मृती, रिचा घोष, दीप्ती शर्मावर असणार

भारतीय फलंदाजांची भिस्त प्रामुख्याने डावखुरी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीवर असेल. शफालीने नेपाळविरुद्ध ८१ धावांची तुफानी खेळी साकारून सूर गवसल्याचे संकेत दिले. तसेच कर्णधार हरमनप्रीतही उत्तम लयीत आहे. याव्यतिरिक्त, रिचा घोष, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज असे फलंदाज भारताच्या ताफ्यात आहेत. गेल्या लढतीत छाप पाडलेल्या दयालन हेमलतावरही लक्ष असेल. सजीवन सजना व अरुंधती रेड्डी यांना मात्र हरमनप्रीत व पूजा वस्त्रकार परतल्याने संघाबाहेर जावे लागू शकते.

गोलंदाजीत पूजा लयीत असल्याने ती व रेणुका सिंग वेगवान माऱ्याची धुरा सांभाळेल. आशा शोबना, राधा यादव, तनुजा कन्वर यांचे फिरकी त्रिकुटही भारताकडे उपलब्ध आहे. श्रेयांका पाटील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने तनुजाला संघात स्थान मिळाले आहे.

बांग्लादेशविरुद्ध भारताचे वर्चस्व १३ पैकी ११ टी-२० लढती जिंकल्या

भारत-बांग्लादेश यांच्यात आतापर्यंत झालेल्या १३ टी-२० सामन्यांत भारताने तब्बल ११ लढती जिंकल्या आहेत. तर बांग्लादेशला फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. तसेच भारताने २०२४ या वर्षात १४ पैकी १० टी-२० सामन्यांत यश संपादन केले आहे. एकूणच पाहता भारतीय महिला टीम सर्वच बाबतीत आघाडीवर असल्याने विजयासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.

महिलांचा टी-२० विश्वचषक हा बांग्लादेशमध्ये ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान खेळवण्यात येणार आहे. त्या स्पर्धेच्या निमित्ताने आशिया चषकाचे महत्त्व वाढले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!