Home » राजकीय » मविआच्या एकतेची वज्रमूठ : पाचोर्‍यातील मेळाव्यात एकजुटीचा निर्धार

मविआच्या एकतेची वज्रमूठ : पाचोर्‍यातील मेळाव्यात एकजुटीचा निर्धार

पाचोरा | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघाची जागा शिवसेना-उबाठा पक्षाला मिळाली असून महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी एकोप्याने काम करून विजय संपादन करण्याचा निर्धार केल्याचे पाचोरा येथील मेळाव्यातून अधोरेखीत झाले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रिंगणात राहणार असल्याने पक्षातर्फे ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यात महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष अर्थात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार यांचे देखील सहकार्य लाभत आहे. या अनुषंगाने पाचोर्‍यात महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्याला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितीन तावडे, शिवसेना-उबाठाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, ललीताताई पाटील, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, उपजिल्हाप्रमुख शेतकरी सेना अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, तालुकाप्रमुख शेतकरी सेना रमेश जी बाफना, शहर प्रमुख दीपक पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत, विधानसभा क्षेत्र प्रमुख पप्पू राजपूत, ज्येष्ठ नेते राजू काळे, विनोद बाविस्कर, बाळू अण्णा, संतोष पाटील, माजी नगरसेवक दादाभाऊ चौधरी, अभिषेक खंडेलवाल, आनंद संघवी, राहुल संघवी, राकेश सोनवणे, गफार भाई, उपजिल्हा युवासेना अधिकारी संदीप जैन, तालुका युवा अधिकारी शशी पाटील, तालुका युवा अधिकारी भूपेश सोमवंशी, शहर प्रमुख मनोज चौधरी, शहर प्रमुख हरीश देवरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून आपल्या उमेदवाराचा प्रचार सुरू होण्याआधी ज्या काही गाठीभेटी सुरू आहेत त्यातून अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले. जनतेत असलेली नाराजी ही मतदानातून अवश्य उमटेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. शिवसेना-उबाठा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आपल्या पक्षाच्या जोडीला असणारे दोन्ही घटक पक्ष हे एकत्रीतपणे काम करणार असल्याने आपल्याला निश्‍चीत याचा लाभ होऊन मविआचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे प्रतिपादन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!