Afghanistan marks historic entry into semis : टी-२० विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करत अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करून प्रथमच टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताकडून काल झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियास उपांत्य फेरी आधीच स्पर्धेतुन गाशा गुडाळावा लागला.
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 क्रिकेट विश्वचषक सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत इतिहास रचला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखाली या विजयासह अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. अफगाणिस्तानच्या या विजयाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ वेळा आणि टी-२० त १ वेळचा अशा ७ वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा उपांत्य फेरी आधीच पॅकअप झाला आहे. भारतासह अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांनी उपांत्य फेरीतले आपले स्थान निश्चित केले आहे. आता भारताची गाठ सेमीफायनल मध्ये २७ जून ला इंग्लंड सोबत होईल.
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या गड्यासाठी ५९ धावांची भागीदारी केली. रहमानउल्ला गुरबाजनं ५५चेंडूत ४३ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ३चौकार आणि १ षटकार लगावला. तर इब्राहिम झद्रानने २९ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. तसेच अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने शेवटच्या षटकांमध्ये १० चेंडूत १९ धावा चोपल्या. अशा प्रकारे अफगाणिस्ताने निर्धारीत २०षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ११५धावा केल्या. बांगलादेशकडून रिशाद होसेन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रिशाद हुसेनने ४ षटकात २६ धावा देत ३बळी घेतले. याशिवाय तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांनी १-१ गडी बाद केला.
पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला १९ षटकांत ११४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र बांगलादेशचा संघ १७.५ षटकांत १०५ धावांत गारद झाला. बांगलादेशसाठी सलामीवीर लिटन दासने कडवी झुंज दिली, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. लिटन दासने ४९चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार मारला. बांगलादेशच्या ९ फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.
अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि नवीन उल हक यांनी सर्वाधिक ४-४ गडी बाद केले. तसेकग फजलहक फारुकी आणि गुलबदीन नायब यांना प्रत्येकी १ विकेट घेतली
