मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मराठी मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे चे दुःखद निधन झाले. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या या अभिनेत्रीची प्राणज्योत अखेर ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे चार च्या सुमारास मालवली. वयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्रीने या विश्वाचा अखेरचा श्वास घेतला.
श्रीकांत मोघे यांची सून आणि शंतनू मोघेची पत्नी असलेली प्रिया ही मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती. मिळालेल्या माहितीनुसार ती गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. प्रिया ही मागील वर्षापासून सामाजिक माध्यमात देखील सक्रिय नव्हती. ज्यात तिने शंतनूसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. ती नेहमीच पती सोबतचे फोटो शेयर करायची. तिने शेवटची पोस्ट ११ ऑगस्ट २०२४ रोजी केली होती.

प्रिया मराठे ने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले. सुंदर चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’सारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका देखील साकारल्या. ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ तसेच शेवटचे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम केले होते. याशिवाय ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा हिंदी मालिकांमधूनही ही मराठी अभिनेत्री घराघरात पोहोचली होती.
प्रिया हिच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर तसेच तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून तिच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्रिया मराठेच्या निधनाने मराठी कलाकारांनाही धक्का बसला असून तेजश्री प्रधान, अदिती सारंगधर, पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदेसह अनेक कलाकारांनी सोशल मिडियावर पोस्ट करून प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे.

