Home » जळगाव » धक्कादायक : घरात घुसुन पत्रकार आणि कुटुंबावर जीवघेणा भ्याड हल्ला !

धक्कादायक : घरात घुसुन पत्रकार आणि कुटुंबावर जीवघेणा भ्याड हल्ला !

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील एका दैनिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी दिपक अमृतकर यांच्या घरावर १५ ते २० लोकांनी अचानकपणे जीवघेणा हल्ला चढवून पत्रकार दिपक अमृतकर, व त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सदर घटनेबाबत मिळालेल्या माहीतीनुसार भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दिपक अमृतकर हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून ते एका दैनिकाचे प्रतिनिधी असून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून वाळू माफिया, घडलेल्या तसेच पोलीसात नोंद असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील काही बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. या बातम्यांचा राग व आकस मनात ठेवून कजगाव येथील त्यांच्या घराशेजारील आणि गावातील सुमारे १५ ते २० लोकांनी दिपक अमृतकर यांच्या घरावर अचानकपणे हल्ला करुन त्यांच्या पत्नी व घरातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान ही घटना घडल्या नंतर पत्रकार अमृतकर यांनी त्यांच्या पत्नी व कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. त्या ठिकाणी सर्वांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. परंतु दिपक अमृतकर यांच्या पत्नीस या मारहाणीत गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

हल्लेखोरांना अटक करा : पत्रकार संरक्षण समितीचा इशारा

पत्रकाराच्या घरावर जीवघेणा भ्याड हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करुन कठोर कारवाई न केल्यास पत्रकार संरक्षण समितीतर्फे भडगाव पोलीस स्टेशन समोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व पत्रकार संरक्षण समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!