मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभेचे दि.७ ते ९ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांची विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली.
विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सदस्य यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवर सदस्यांनी सदस्यपदाची शपथ घेतली.
कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्र विधानसभेच्या ज्येष्ठ सदस्यांपैकी एक आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. प्रोटेम स्पीकर हे पद तात्पुरते असते, ज्याचे मुख्य कार्य विधानसभेच्या नवीन सदस्यांना शपथ देणे आणि सभापतीची निवड करणे हे आहे. कोळंबकर यांची या पदावर नियुक्ती करून सरकारने त्यांच्या अनुभवावर आणि नि:पक्षपातीपणावर विश्वास व्यक्त केला आहे.
नवीन विधानसभेच्या स्थापनेनंतर ते सदस्यांना शपथ देतील आणि सभागृहाची पहिली बैठक आयोजित करतील. यासोबतच स्थायी सभापती निवडीपर्यंत विधानसभेच्या कामकाजावर मार्गदर्शन करणार आहेत.
