जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी शिबिराचे शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात उद्घाटन निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे अध्यक्ष अशोक बारी, मुख्याध्यापक आर.एस. आंबटकर, डॉ.डी.आर. क्षीरसागर, कार्यक्रमाधिकारी प्रा.जी.व्ही. धुमाळे, प्रा.स्वाती लोखंडे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.बी. युवाकुमार रेड्डी यांनी भूषविले.
यावेळी शिबिरात उद्घाटन पर मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार बारी यांनी शिरसोली गावातील शिक्षण विषयक जनजागृती संदर्भात भाष्य करत शासकीय योजना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य रेड्डी यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्देश संदर्भात मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक आंबटकर यांनीही मनोगत व्यक्त करून शिबिरास शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी प्राध्यापक धुमाळे यांनी प्रास्ताविक पर मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरादरम्यान राबविलेल्या उपक्रमाचा आढावा घेऊन पुढील सात दिवसाच्या कृती कार्यक्रमाचा पट मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कोमल पाटील हीने केले तर आभार प्रा.स्वाती लोखंडे यांनी मानले. त्यानंतर प्राध्यापक नितीन मटकरी यांनी ग्राहक संरक्षण तर प्रा.डॉ.ज्योती भोळे यांनी ऊर्जा बचत संदर्भात मार्गदर्शन केले.
