Home » जळगाव » रक्षा खडसेंनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ ; राज्यातून एकमेव महिला

रक्षा खडसेंनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ ; राज्यातून एकमेव महिला

Raksha Khadse took oath as Union Minister of State :
रावेरच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राष्ट्रपती यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रक्षा खडसे या मंत्रिमंडळातील दुसऱ्या सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रक्षा खडसे ह्या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. एनडीए सरकारमध्ये रक्षा खडसेंना केंद्रीय मंत्रि‍पद मिळाले आहे. रक्षा खडसेंना मंत्रि‍पदाची संधी मिळताच रावेरमध्ये जंगी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रक्षा खडसेंना कुठली जबाबदारी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रक्षा खडसेंची राजकीय वाटचाल सरपंच या पदापासुन झाली. कोथळी, गावात त्या सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद – जळगाव जिल्हा सदस्य आणि अध्यक्ष ( सभापती) आरोग्य विभाग, शिक्षण आणि क्रीडा समिती जिल्हा परिषद, जळगाव, असा राजकीय प्रवास सुरु असतांना २०१४ ला पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. नंतर २०१९ आणि २०२४ असे सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. आणि आज ९ जून २०२४ रोजी रक्षा खडसे यांनी केंद्रीय मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

जनतेच्या आशीर्वादामुळेच हे शक्य : एकनाथ खडसे
रक्षा खडसेंना मंत्रिपदाची संधी मिळाल्यावर ज्येष्ठ नेते तथा रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे म्हणाले की, रक्षाताईंना मंत्रीपद मिळत आहे. याचा आमच्या परिवाराला अतिशय आनंद आहे. सलग तीन वेळा रक्षाताई रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची तिसरी टर्मही चांगली राहील. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे रक्षाताई आज उच्चपदापर्यंत जाऊ शकल्या. आमच्या परिवारातील एक सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात जात आहे, याचा आम्हाला आनंद आहे. रक्षाताईंनी अनेक वर्ष केलेल्या श्रमाचे हे फळ आहे. त्याचबरोबर जनतेचे त्यांच्या पाठीशी असलेले आशीर्वाद यामुळे हे शक्य झाले आहे. देशाबरोबर आपल्या भागासाठी रक्षाताई नक्की योगदान देतील, असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत.

दरम्यान, दिल्लीत होणारा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी मुक्ताईनगर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. या एलईडी स्क्रीनवर शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. शपथविधी सोहळा पाहण्यासाठी गावकरी तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुक्ताईनगर या ठिकाणी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!