कोल्हापुर ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या योजनेबद्दल विरोधकांनी अनेक संभ्रम पसरवले तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांनी निक्षून सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही योजना निवडणुकीपूरती नसून कायमस्वरूपी आहे. त्यासाठी ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही स्पष्ट केले. या योजनेच्या रक्कमेत भविष्यात नक्की वाढ करू असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच गेल्या काही दिवसांपासून बँकांकडून परस्पर पैसे काढून घेतले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या पण ते परस्पर काढले जाऊ नयेत यासाठी बँकांना स्पष्ट निर्देश दिले असल्याचे मुख्यंमत्री म्हणाले.

माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली असून संपूर्ण राज्यातून १.४० कोटी हून अधिक महिलांनी अर्ज भरले आहेत. या योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचे प्रत्येकी दोन हप्ते जमा झाले आहेत. ज्या महिला बाकी आहेत त्यांनाही लवकरच पैसे मिळतील असेही यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
तत्पुर्वी कोल्हापूरात मुख्यमंत्री यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी गुलाबपुष्प उधळून स्वागत करत मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री यांना राख्याही बांधल्या.


या सोहळ्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, लोकसभा सदस्य धैर्यशिल माने, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश पाटील, सदाभाऊ खोत, पुणे महसूल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी उपस्थित होते.
