मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणेसाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक १९ जून २०२४ पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई पदांकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी दोन ठिकाणी किंवा दुसऱ्या दिवशी इतर ठिकाणी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची शक्यता लक्षात घेता, त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होवू शकते.
या कारणामुळे अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कडून सर्व घटक प्रमुखांना व Mahait विभागास एका पत्रकाद्वारे सूचना देण्यात आली आहे की, ज्या उमेदवारांना एकाच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहणेसाठी सूचना मिळाली असेल ते उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी हजर राहण्यासाठी वेगळी तारीख देण्यात यावी. दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी त्या दिवशी घ्यावी. तसेच मैदानी चाचणी ची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ दिवसांचे अंतर असावे. मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी त्यास सादर करावे लागतील.
दरम्यान “पोलिस भरती २०२२-२३ मधे ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना याबाबत काही अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा” असे एका पत्रकाद्वारे सुचीत करण्यात आले आहे.
