Home » मनोरंजन » ऐनपुर महाविद्यालयात काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न …

ऐनपुर महाविद्यालयात काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न …

ऐनपूर ता.रावेर ( प्रतिनिधि )
येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे आज दि .२३ रोजी मराठी विभागामार्फत ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा ‘ अंतर्गत काव्यवाचनाचा कार्यक्रम साजरा झाला. सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. जे. बी.अंजने हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी भाषेची भावी स्थिती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामध्ये सर्व शाखांचा अभ्यासक्रम हा मराठी भाषेतून होणार असल्याची माहिती मिळाल्याने विद्यार्थी वर्ग आनंदात होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे यांनी मराठी भाषा संवर्धनाची गरज कशी आहे – हे प्राचीन संदर्भ लक्षात घेऊन ज्ञानेश्वरांपासून ते आजतागायत मराठी भाषा संवर्धनाची गरज कशी महत्त्वाची आहे हे सांगितले.
याप्रसंगी ऐनपुर येथील रहिवासी तसेच पत्रकार तथा काव्य लेखनाचा छंद जोपासणारे कवी – इकबाल पिंजारी यांनी त्यांच्या स्वरचीत काव्य संग्रहाचे वाचन केले. त्यांनी ‘मन’ ही तत्त्वज्ञानात्मक कविता ; तर ‘प्रेम’ ही मानवी जीवनाविषयक भाव व्यक्त करणाऱ्या काव्याचे वाचन केले. त्यांच्या या काव्य वाचनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली . काही वेळ तर सर्व विद्यार्थी भारावून गेले. मराठी भाषेचे जतन करणे काळाची गरज असून ती सर्वांचीच जबाबदारी आहे असे इकबाल पिंजारी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.एस.पी.उमरीवाड ,प्रा. डॉ.नरेन्द्र मुळे, प्रा.ज्ञानेश्वर कोळी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!