Dy CM Comment …Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत उमेदवारी द्यावी असा आमचा आग्रह होता. आणि तो मान्य करत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यासाठी आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. या निर्णयानंतर परळीत मुंडे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुंडे समर्थकांनी एकत्र येत पंकजा मुंडे यांच्या नावाने घोषणाबाजी करत हा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडत हा जल्लोष साजरा करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता. या पराभवानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळाला होता.
दरम्यान भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या या निवडीनंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या संधी नंतर नेमके जिल्ह्यातील राजकीय घडामोडी कशाप्रकारे होतात ते येत्या काही दिवसांत बघायला मिळणार आहे.
◆ देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार :
“आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो” भाजपकडून विधानपरिषदेसाठी पाच नावे जाहीर झाली आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. विशेषत: आमच्या सर्वांचा आग्रह होता की पंकजा ताईंना विधानपरिषदेत उमेदवारी दिली जावी. केंद्रीय भाजपने हे मान्य केले आहे आणि त्यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
