जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, दिंडी पिंप्राळा परिसरातील विठ्ठल मंदिरात विठ्ठल नामाच्या गजरात नेण्यात आली. यावेळी प्रथम शाळेच्या प्रांगणात संस्थाध्यक्ष डॉ. डाकलीया, संस्थेचे सचिव विश्वनाथ जोशी, संस्थेचे सदस्य देवेंद्र अग्रवाल, परिसरातील मान्यवर व पूजेचे मानकरी साहित्यिक प्रभाकर महाजन, शरद बडगुजर सेवानिवृत्त अधिकारी आरोग्य विभाग, विलासचंद्र अंबटकर सेवानिवृत्त अधीक्षक जिल्हा न्यायालय, पूजेचे मानकरी पालक समाधान पाटील यांच्या शुभहस्ते सपत्नीक पालखी पूजन व आरती करण्यात आली.

याप्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्रांगणात टाळ मृदुंगाच्या तालामध्ये विठ्ठल नामाच्या गजरात पाऊली घेण्यात आली तसेच फुगड्या खेळण्यात आल्या. विठ्ठलाच्या भक्ती गीताने शालेय परिसर मंत्रमुग्ध होऊन गेला.

विठ्ठल मंदिरात दिंडी जात असताना परिसरातील नागरिकांनी पालखीचे स्वागत करत पालखी पूजन केले. मंदिर व्यवस्थापनाने पालखीचे उत्साहात स्वागत केले. तसेच विठ्ठल मंदिराचे पुजारी जोशी, सेवेकरी साई पाटील यांनी वारी म्हणजे काय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संगीता महाजन यांनी भजन सादर करून विठ्ठल माऊलीचा गजर करून जयघोष करण्यात आला.


यावेळी विठ्ठलाची भूमिका राजनंदनी पाटील, रुक्मिणी विद्या निकुम, संत ज्ञानेश्वर दर्शन बडगुजर, तुकाराम महाराज मयुरेश प्रजापत, गोराबा कुंभार साहिल सोनवणे, संत एकनाथ दुर्गेश लिंगायत, संत जनाबाई टीना महाजन या विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषा साकारल्या .
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले प्रसंगी सर्व विद्यार्थी तसेच उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आला.
