चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : सध्याच्या यांत्रिक युगात मनुष्याचे जीवनचक्र हे खूपच धावपळीचे झाले आहे. विविध संशोधनामुळे बसल्या जागी आपण आपली बरीचशी कामे उरकवून घेत असतो. विशेषतः मोबाईलमुळे आपल्याला खूपच सोपे झाले आहे. पाहिजे ती माहीती आपण चुटकी वाजवताच आपल्याला मोबाईल वर कळू शकते. मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर हे मानवास हानी कारक ठरू शकते.
अशातच या नित्य जीवनात मोबाईल पलीकडचे आनंदी जग ही संकल्पना घेऊन चाळीसगाव पोलीस व रोटरी क्लब चाळीसगाव यांच्या वतीने हॅपी स्ट्रीट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जास्तीत मुलांना सहभागी करुन घेण्यात आले होते. सदर उपक्रमाला आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन सर्व सहभागी चाळीसगावकर बालगोपाळांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करत आनंदात सहभागी झाले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्यासह रोटरी परिवार व चाळीसगाव पोलीस प्रशासनातील अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. बालगोपाळांनी हाताने बनविलेल्या विविध वस्तु, टाकाउतून टिकाऊ वस्तु, पृष्ठाच्या विविध वस्तु, त्यावर केलेली सजावट व रंगकाम इत्यादी सर्व बघून आमदार चव्हाण यांनी मुलांचे कौतुक केले.


दरम्यान या उपक्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलींनी सादर केलेले लेझिम नृत्य सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. तर मैदानातले बालपणातले खेळ तसेच हातावर भवरा फिरवणे आदी बघून आमदार चव्हाण तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. रेड्डी यांना भवरा खेळण्याचा मोह आवरता आला नाही, आणि त्यांनी देखील या बालकांसोबत खेळण्याचा आनंद लुटला. चाळीसगाव पोलीस व रोटरी क्लब चाळीसगाव यांच्या वतीने हॅपी स्ट्रीटचे आयोजन करुन एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आयोजकांचे अभिनंदन केले.
