Home » महाराष्ट्र » राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : नाशिक शहरात ९० च्या दशकानंतर  मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे ठरले असून नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. राज्याच्या उद्योग संचालनालयातर्फे हॉटेल द गेट वे येथील आयोजित इन्व्हस्टमेंट समीट नाशिक २०२५ मध्ये डॉ. गेडाम बोलत होते.

यावेळी ‘मैत्री’च्या समन्वय अधिकारी प्रियदर्शिंनी सोनार, उद्योग विभागाच्या सह संचालक वृषाली सोने, नाशिक डाकघरचे प्रवर अधिक्षक प्रफुल्ल वाणी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे सचिन सोनटक्के, ‘निमा’चे अध्यक्ष ललित बूब, आयडीबीआय बँकेचे न्यू इंडिया इन्शोरन्सचे सहाय्यक व्यवस्थापक अनुप चव्हाण, एमसीसीआयए चे चेअरमन सी.एस. सिंग, इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कांउन्सिलचे प्रादेशिक संचालक सी.एच.नादीगर यांच्यासह अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

आज झालेल्या गुंतवणूक बैठकित नाशिक २०२५ मध्ये १४२ उद्योगांचे  सामंजस्य करार झाले. यातून ६ हजार ४०४ कोटी रूपयांची गुंतवणूक झाली असून १४ हजार ४०३ रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

डॉ. गेडाम म्हणाले की, नाशिकला व वायनरी उद्योग व पर्यटनक्षेत्रात अधिक संधी आहे. येणाऱ्या दोन वर्षात नाशिकच्या विकासाला निश्चित चालना मिळणार आहे. यात नाशिक ते पुणे व मुंबईपर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार आहे. पुणे शहराच्या धर्तीवरच नाशिकलाही याचा लाभ होणार आहे. नाशिक येथे सुरू झालेल्या विमानतळामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमानतळाचा विस्तार होणे गरजेचे आहे. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!