मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मराठी चित्रपटसृष्टीमधून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. अतुल परचुरे यांनी प्रेक्षकांचं अगदी खळखळून मनोरंजन केलं. रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली दैदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली.
अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. उपचारानंतर ते बरेदेखील झाले होते. गंभीर आजारपणातून बरे होतं अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेले पाहायला मिळाले होते. आजवर अतुल यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र मधल्या काही काळात अतुल यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. आजारपणाशी लढा देत अतुल यांनी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास ठेवला होता.
तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु.ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे.
