पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव-पाचोरा खरीप हंगामाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून परिसरातील प्रमुख पीक असणारे कापूस सध्या बाजारात उपलब्ध होत नसल्याने कापुस बियाण्याची टंचाई भासताना दिसत आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आवाज उठवला असून प्रांताधिकारी यांना भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन दिले आहे.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या विषयाला वाचा फोडली. पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी खरीप हंगाम लागवडीच्या तयारीला लागले असून आपल्या शेतीची मशागत करून लागवडी साठी त्यांना आवश्यक असणारे कापूस पिकांच्या बियाण्याची टंचाई भासत असल्याने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या काळात देखील दुष्काळ सदृश्य तालुक्याच्या नावाने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल झाली आहे. शेजारील चाळीसगाव तालुक्यातील माझे मित्र आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून घेण्याकरिता विशेष प्रयत्न करून जवळपास १३३ कोटीचे पॅकेज चाळीसगाव तालुक्याला मंजूर करून घेतले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना भरीव अशी मदत शासनाकडून मिळाली, परंतु येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त न करून घेता फक्त दुष्काळ सदृश्य घोषित झाला सांगत येथील शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत.
प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने फायदा झाला नसून येथील शेतकरी आजही मदतीच्या आशेवरच आहे. त्यात आता अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या ऐन खरीप हंगामाच्या लागवडीला सुरुवात झाली असताना शेतकऱ्यांना आवश्यक ते बियाणे उपलब्ध होत नसल्याचे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने यासंदर्भात उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना निवेदन देऊन याबाबतीत तात्काळ कृषी विभागाला सूचना कराव्यात व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल अशा उपाययोजना करून तात्काळ बियाणे टंचाई दूर करावी अन्यथा सत्तेतील पक्षात असताना देखील पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकरीता शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.
