मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठा वाद झाला असल्याची बातमी समोर येत आहे. विदर्भातील जागांच्या वाटपावरून हा वाद निर्माण झाला. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद इतका तीव्र झाला की, ठाकरे गटाने नाना पटोले असतील तर बैठक होणार नाही, अशी भूमिका घेतली. या वादावर पडदा पाडण्यासाठी काँग्रेसने एका दिग्गज नेत्याला मुंबईच्या दिशेला रवाना होण्याचे आदेश दिले आहेत.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत आज मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप खरेतर अंतिम टप्प्यात आहे. पण विदर्भातील जागांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. मविआच्या जागावाटपाच्या आजच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काही जागांवर दावा करण्यात आला. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाद उफाळला.
जागावाटपाच्या तिढ्यावर सामंजस्याने चर्चा व्हावी, यासाठी बैठक पार पडत होती. पण या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात मोठा वाद झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या वादानंतर ठाकरे गटाने टोकाची भूमिका घेतली. नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीची जागावाटपवर बैठक होणार नाही, अशी थेट भूमिकाच ठाकरे गटाने घेतली. त्यामुळे या वादाची दखल काँग्रेसच्या हायकमांडला घ्यावी लागली.
काँग्रेस हायकमांडने काँग्रेसचे ज्येष्ठ तथा शांत आणि संयमी असलेले नेते बाळासाहेब थोरात यांना तातडीने मुंबईत जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात आपला दौरा अर्थवट टाकून मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याचे कळते.
संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच शांत आणि संयमी असलेल्या बाळासाहेब थोरात यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
