जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ मध्ये हिंदी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता दिली. ज्याला आज ७५ वर्ष पूर्ण झाले आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदी भाषा आणि साहित्याने फार मोलाची भूमिका निभावली आहे. अनेक अहिंदी भाषिक नेत्यांनी आपले विचार हिंदी मध्येच प्रकट केले कारण ती संपूर्ण देशात समजली जाणारी भाषा आहे. तिला बोलणाऱ्यांची लोकसंख्या अधिक आहे. आणि ती सहज, सोप्या अशा शब्दांनी संपन्न आहे.
आज अनेक क्षेत्रात तिचा वापर सुद्धा खूप आहे. खऱ्या अर्थाने देशाची राष्ट्रभाषा म्हणून जनतेच्या मनातील भाषा आहे. इतर भाषांमध्ये सामंजस्य स्थापित करीत हिंदी भाषेने आपली महत्वाची भूमिका निभावली आहे. असे विचार हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी दिवस कार्यक्रमात स्वामी विवेकानंद कनिष्ठ महविद्याल्याच्या उप प्राचार्या प्रा. करुणा सपकाळे यांनी प्रकट केलेत. त्या हिंदी दिवस सोहळ्याच्या मुख्य अतिथी होत्या.
हिंदी दिवसानिमित्त आयोजित सदर कार्यक्रमात हिंदी मध्ये प्रसिद्ध असलेल्या लघुकथा, कविता आणि नाट्य छटांचे वाचन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात केले. या कार्यक्रमाला भाषा प्रशाळेचे संचालक डॉ.भूपेंद्र केसूर हे अध्यक्ष स्थानी होते. त्यांनी सुद्धा आपल्या भाषणातून भाषा आणि मानवी जीवन यांच्या सह संबंधावर प्रकाश टाकला. तसेच हिंदी भाषेचे महत्व आणि वैशिष्ठे सांगितली.
व्यासपीठावर हिंदी विभाग प्रमुख डॉ. रोशनी पवार, डॉ. मनोज महाजन, प्रा.विनोद अहिरे हे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाचे प्राध्यापक विजय लोहार यांनी केले. सूत्र संचालन प्रा.उज्वला पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
