Headlines
Home » जळगाव » मू.जे. महाविद्यालयाचे ‘व्हिडिओ स्पीच’ स्पर्धेत यश

मू.जे. महाविद्यालयाचे ‘व्हिडिओ स्पीच’ स्पर्धेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरीय ‘व्हिडिओ स्पीच’ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत उत्तुंग यश संपादन केले. नंदुरबार येथील जी.टी. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ७ जानेवारी २०२५ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पूर्वनिर्धारित विषयांवर तीन मिनिटांचा इंग्रजी भाषेतील व्हिडिओ तयार करून सादर करायचा होता.

मू.जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध गटांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली. पदवी श्रेणीतून रुचिता गणेश सोनगिरे हिने प्रथम पारितोषिक पटकावले, तर आदित्य रमेश वानखेडे याला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

पदव्युत्तर श्रेणीत, मधुरा सचिन दुनाखे हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर प्रज्ञा शामसिंग सोलंकी हिने द्वितीय क्रमांकाची बाजी मारली. याशिवाय, प्रतीक भरत वरयानी याला दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेतील उत्कृष्ट सहभागी विद्यार्थी म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ही कामगिरी महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्कर्षाची ओळख निर्माण करणारी ठरली आहे.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना. भारंबे, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे, अधिष्ठाता प्रा. भूपेंद्र केसूर, प्रा. पंडित चव्हाण, प्रा. योगिनी राजपूत, प्रा. कीर्ती सोनवणे, प्रा. सुनीता तडवी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या प्रा. सुरेखा पालवे, अधिष्ठाता डॉ. अब्दुल आरसीवाला इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!