जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनी आयोजित रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी १५ हजार मिनिटे वाचन केले. बुधवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गणपती नगरातील भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन नगरीत (रोटरी हॉल) महावाचन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांनी वाचन करून या अभियानाचा शुभारंभ केला. याप्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ.चंद्रशेखर सिकची, प्रेम कोगटा, व.वा.जिल्हा वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील सहप्रांतपाल डॉ.अपर्णा भट – कासार, प्रोजेक्ट चेअरमन विजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अभियानास प्रत्यक्ष भेट देऊन वाचन करीत सहभाग घेतला. या अभिनव उपक्रमाचे त्यांनी कौतुक करून त्याच सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अनिलकुमार शाह यांनी बोलताना वाचन संस्कृतीला चालना देणारा आणि जळगावची ओळख वाचणार गाव अशी करणारा हा उपक्रम आहे. दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले.
सायंकाळी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉ. राजेश पाटील, लिटरसी कमिटी चेअरमन प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, नॉन मेडिकल कमिटी चेअरमन संदीप शर्मा यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. तसेच आगामी वर्षात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या सर्व रोटरी क्लब मध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस डॉ. राजेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
रोटरीचे ज्येष्ठ सदस्य कवरलाल संघवी, प्रा. राजेंद्र देशमुख, हरिप्रसाद काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक तर आभार मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांनी मानले. सूत्रसंचालन संवाद सचिव व प्रोजेक्ट को-चेअरमन पंकज व्यवहारे यांनी केले.

