जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
“दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी संपत्तीपेक्षा मनाच्या मोठेपणाची गरज असते,” हाच वारसा जपत जैन इरिगेशनने एका धाडसी बालकाचे भविष्य सावरले आहे. चोपडा तालुक्यातील अनेर नदीत बुडणाऱ्या चार मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (१४) याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने स्वीकारली आहे.
नेमकी घटना काय?
चोपडा तालुक्यातील गणपूर येथील चार अल्पवयीन मुले (वय १६) अनेर नदीच्या पात्रात स्नानासाठी उतरली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने ही चौघेही बुडू लागली. याच वेळी तिथून जात असलेल्या ओम पाटील याने क्षणाचाही विलंब न लावता नदीच्या डोहात उडी घेतली आणि आपल्या प्राणांची पर्वा न करता त्या चारही मुलांचे प्राण वाचवले.
गरिबीवर मात करत ध्येयाकडे वाटचाल
ओम हा गणपूर येथील विकास विद्यालयात ८ वीच्या वर्गात शिकत आहे. त्याचे वडील रवींद्र पाटील आणि आई सारलाबाई हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, पत्र्याच्या घरात राहून ओम आणि त्याचा मोठा भाऊ (११ वी) शिक्षण घेत आहेत. आर्थिक चणचणीमुळे त्यांच्या शिक्षणासमोर अनेक अडचणी होत्या.
अशोक जैन यांनी दिली मदतीची ग्वाही
ओमच्या या अतुलनीय शौर्याची बातमी वृत्तमाध्यमातून समजताच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी तातडीने मदतीचा निर्णय घेतला.
“संपत्तीच्या गरजेपेक्षा मनाच्या मोठेपणाची आज सर्वात जास्त गरज आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन तथा श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या या विचारांचा वारसा जैन परिवारावर आहे. संस्कारशील विचारांचा आधार या कार्याला आहे. समाजातील गरजू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जैन इरिगेशन कायमच अशा मुलांना मदतीचा हात देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.”
अशोक जैन
अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड
