आग्रा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आयकर विभागाने आग्रा येथे तीन बूटांच्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले. गेल्या काही दिवसांत १०० पेक्षा अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. या धाडीत पाच-पाचशेंच्या नोटांचे बंडल मोजण्यासाठी आयकर विभागाचे ३० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान आग्रा येथील छापेमारीत बूट व्यावसायिकाच्या घरातून मोठी रोकड जप्त करण्यात आली असुन ही रक्कम त्याने बेड आणि कपाटामध्ये लपवून ठेवलेली होती. त्याठिकाणी अधिकाऱ्यांना नोटांचा मोठा ढिग आढळून आला.
या छापेमारीत सुमारे ६० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाला या व्यापाऱ्यांकडे करचोरी आणि बेहिशोबी मालमत्ता असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी हा छापा मारला. आयकर विभागाच्या टीमने आग्रामधील एमजी रोडवरील बीके शूज, धाकरनमधील मंशु फूटवेअर आणि हेंग की मंडीमधील हरमिलाप ट्रेडर्स आणि जयपूर हाऊसमधील निवासस्थानातील बेहिशोबी मालमत्ता प्रकरणातील कागदपत्रांची झडती घेतली. प्राप्तिकर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ६० कोटी रुपये रोख, सोने-चांदीचे दागिने तसेच जमिनीतील गुंतवणुकीची कोट्यवधी रूपयांचे कागदपत्रे जप्त केले आहेत.बुट व्यापारी हरमिलाप ट्रेडर्सचे मालक आणि व्यापारी रामनाथ डांग यांच्या घरातून ४० कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
