मुंबई,दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने १७ व्या सिझनचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदा आयपीएल स्पर्धा ही दोन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले असुन बीसीसीआयने १७ दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार २२ मार्च ते ०७ एप्रिल दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २१ सामने पार पडतील. यंदाचा सलामीचा सामना सामना हा चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार असुन पहिल्या टप्प्यातील अखेरचा सामना हा ०७ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल .
२०२३ प्रमाणेच यावर्षीच्या १७ व्या मोसमात एकूण ७४ सामने खेळले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकांमुळे ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय झाला आहे . उर्वरित वेळापत्रक हे लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकानुसार जाहीर केलं जाणार असल्याचंही धूमल यांनी स्पष्ट केलं . त्यामुळे आता चाहत्यांना उर्वरित वेळापत्रकासाठी लोकसभा निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे.
बहुचर्चित मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कधी ?
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व ह्या वर्षी रोहीत शर्मा ऐवजी हार्दिक पंड्याकडे दिल्यामुळे क्रिकेट जगतात असंख्य चाहत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. कप्तान बदलल्याने रोहीत व मुंबई इंडियन्सचे समर्थक नराज असल्याचे दिसुन आले .अशात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रविवारी २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हार्दिकची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली आहे व तो मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे आता हार्दिक आपल्या नेतृत्वात मुंबईला विजयी सुरुवात देणार का …! याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून असणार आहे.
