दुबई ( वास्तव पोस्ट ) : विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या विजयासह भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम फेरीत पोहोचला. भारताने २६५ धावांचे लक्ष्य ४८.१ षटकांत ६ गडी गमावून पार केले. यासह मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला स्थान मिळवण्यात यश मिळण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. भारताने यापूर्वी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक, २०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यातही स्थान मिळवले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ४९.३ षटकांत २६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने ९६ चेंडूत सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तसेच ऍलेक्स कॅरेने ५७ चेंडूत ६१ धावा केल्या. या दोघांशिवाय ट्रॅव्हिस हेडने ३९ आणि मार्नस लॅबुशेनने २९ धावा केल्या. या चौघांनीच २० धावांचा टप्पा पार केला. बाकी कोणी खास काही करू शकले नाहीत. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना, कोहलीने ९८ चेंडूत ५ चौकारांसह ८४ धावा करत पुन्हा एकदा आपण चेस मास्टर असल्याचे सिद्ध केलेआणि भारताने ४८.१ षटकांत ६ बाद २६७ धावा केल्या आणि सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. भारताने ४३ धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कोहलीने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला.
■ विराट कोहलीचे हुकले शतक
दरम्यान श्रेयस अय्यरचे अर्धशतक हुकले. तो ६२ चेंडूत तीन चौकारांसह ४५ धावा काढल्यानंतर बाद झाला. श्रेयस बाद झाल्यानंतरही कोहली क्रीजवर टिकून राहिला आणि भारताला विजयाच्या जवळ नेले. कोहली शतकाकडे वाटचाल करत होता पण ॲडम झंपाच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. विराट ९८ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ८४ धावा काढून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने संघाची जबाबदारी स्वीकारली. हार्दिकने आक्रमक फलंदाजी केली आणि भारताला विजयाच्या अगदी जवळ आणले. संघाला विजयासाठी सहा धावांची आवश्यकता असताना, हार्दिक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने १ चौकार तसेच ३ उत्तुंग षटकरांच्या मदतीने २४ चेंडूंत २९ धावा केल्या.
■ भारताने सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत केला प्रवेश

हार्दिक बाद झाल्यानंतर केएल राहुलने मॅक्सवेलच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. यासह, भारताने सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात पोहोचण्यातही संघ यशस्वी झाला होता. राहुलने ३४ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह ४२ धावा काढल्या, तर जडेजाही दोन धावा काढल्यानंतर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि ॲडम झांपा यांनी प्रत्येकी दोन, तर बेन द्वारशुइस आणि कूपर कॉनोली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
■ भारत अंतिम सामन्यात कोणाशी भिडणार
आता भारताचा अंतिम सामना दुसऱ्या उपांत्य सामन्यातीलस विजेत्या संघाशी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघांत लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार. या सामन्यातील विजेता संघ ९ मार्च रोजी भारताशी दुबईत भिडणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत.
