Headlines
Home » जळगाव » ‘पाडवा पहाट’ या मैफिलीत सुरांची अतिशबाजी

‘पाडवा पहाट’ या मैफिलीत सुरांची अतिशबाजी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सालाबादप्रमाणे यावर्षी पण स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित दिवाळी ‘पाडवा पहाट’ या कार्यक्रमाचे २३ वे पुष्प आज रोजी महात्मा गांधी उद्यानात गुंफले गेले. या कार्यक्रमास कैलासवासी नथ्थू शेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री प्लायवूड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस वरुण नेवे यांनी प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदना सादर केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी प्रमुख उपस्थित मेजर नाना काका वाणी, राजेंद्र कुलकर्णी व निशा जैन यांचे स्वागत केले. तसेच आजचे कलाकार सुरमणी धनंजय जोशी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

यावेळी सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनंजय जोशी यांना तबल्याची संगत कार्तिक स्वामी दहिफळे, संवादिनीची साथ श्रीराम जोशी, तर पखवाजाची साथ अमोल लाकडे आणि मंजिरीची साथ प्रसन्न भुरे या युवा कलावंतांनी केली. सुरुवातीस अहिर भैरव रागातील ‘अलबेला साजन आयो रे…’ ही तीन तालातील बंदीश सादर केली. त्यानंतर त्याला जोडूनच जय जय गौरीशंकर नाटकातील ‘जय शंकरा गंगाधरा’ या नाट्यपदाने मैफिलीत रंगत भरली.

पं.भीमसेन जोशींनी अजरामर केलेली ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ सादर केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेले ‘अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ हा अभंग सादर केला ‘पद्मनाभा नारायणा’ या गीता बरोबरच ‘मर्मबंधातली ठेव ही प्रेम मय’ या नाट्यपदाने मैफिलित रंग भरला. ‘बाजी मुरलिया बाजे रे’, ‘संत भार पंढरीत’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘अवघी गरजे पंढरपुर’, या अभंगांनी मैफिल एका उंचीवर जाऊन पोहोचली. ‘तमनीशे चा सरला’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली. तत्पूर्वी गेल्या वर्षभरात प्रतिष्ठानच्या वतीने आपली कला सादर करणाऱ्या युवा व आश्वासक अशा स्थानिक कलावंतांचा सत्कार करण्यात आला व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

पाडवा पहाट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नुपूर चांदोरकर खटावकर यांनी केले दीर्घकाळ स्मरणात राहील अशा मैफिलीचे आयोजन प्रतिष्ठानच वतीने करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!