Home » जळगाव » व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपल्यातील कौशल्ये ओळखणे आवश्यक : डॉ. आशुतोष पाटील

व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपल्यातील कौशल्ये ओळखणे आवश्यक : डॉ. आशुतोष पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी आपल्यातीलं अंत:प्रेरणा महत्त्वाची ठरते. प्रत्येकात कोणती ना कोणती कौशल्ये असतात. त्याला चालना देण्यासाठी आपण श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्ये अंगीकृत करणे आवश्यक आहे असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ. आशुतोष पाटील यांनी व्यक्त केले.

​भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यामिनिमित्ताने मूळजी जेठा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता यांचा वापर आपल्या व्यक्तिमत्त्वात भर घालतो. साहित्याचे वाचन आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देते. आपल्याला शिक्षण घेणे महत्त्वाचे आहेच परंतु जीवनात अनुभवशिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे ते म्हणाले.

​बाह्यप्रेरणा आणि आंतरिक प्रेरणा यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या कामात आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे. भाषिक प्रगती साधण्यासाठी साहित्याचे वाचन,चिंतन आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष बी.ए. च्या मराठी विषयाचे डॉ. योगेश महाले यांनी संपादित केलेले ‘साहित्य वैभव’ या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. आशुतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे होते. यावेळी बोलतांना त्यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. ‘मिसाईल मॅन’ ही ओळख निर्माण करणारे कलाम यांचे आयुष्य समजून घेऊन त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असेही ते म्हणाले. वाचन ही आपल्याला सर्वार्थाने समृद्ध करणारी बाब आहे. एक उत्तम वाचक म्हणून प्रत्येकाने स्वत:ला तयार केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील, अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी, डॉ. योगेश महाले उपस्थित होते. कार्यक्रमाला केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, डॉ. भाग्यश्री भलवतकर, डॉ. विजय लोहार, डॉ. अतुल पाटील, प्रा. रेणुका झांबरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपीचंद धनगर व आभार प्रा. वर्षा उपाध्ये यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!