Home » जळगाव » राजपूत समाजातील उच्चशिक्षित, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉ. विजेता सिंह

राजपूत समाजातील उच्चशिक्षित, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉ. विजेता सिंह

ज्या समाजामध्ये महिलांना घराच्या बाहेर पडणे अशक्य होते अशा राजपूत समाजातील डॉ. विजेता सिंह या परिसरातील सतरा गावांमधील पहिल्या महिला उच्चशिक्षित आहेत. उच्च शिक्षणाबरोबरच त्यांचे सामाजिक भान जागृत आहे त्यामुळेच त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवलेले आहेत. डॉ. विजेता सिंह यांच्या शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीची कहाणी या ठिकाणी देत आहोत…

डॉ. विजेता सिंह या मूळच्या भोपाळ येथील आहे. मात्र भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर वडील शीतलासकस सिंह कामानिमित्त जळगावला स्थायिक झाले. डॉ. विजेता सिंह यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण हिंदी तर उर्वरित शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालेले आहे. त्याचबरोबर त्यांनी कायद्याच्या उच्च पदवी देखील प्राप्त केलेल्या आहेत. BSL, LLB, LLM, PhD, PGDCC aanu Net अशा शिक्षण क्षेत्रातील उच्च पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. २००६ मध्ये त्यांनी BSL, LLB पूर्ण केले तर २००८ मध्ये त्यांनी LLM पूर्ण केले. डॉ. विजेता सिंह या मुळातच हुशार आणि कष्टाळू असल्यामुळे त्यांनी गुणवत्ता यादीतील आपले स्थान कायम ठेवले होते. त्यांची गुणवत्ता आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगती पाहून त्यांना कॉलेजने जॉब ऑफर केला होता. शिक्षण आणि जॉब असल्या दोन्ही गोष्टी त्या करत होत्या.

शिक्षण आणि प्रोफेशनल क्षेत्रातील गुरु

डॉ. विजेता सिंह या शिक्षण घेत असताना आणि व्यवसायासाठी कार्य करत असताना त्यांना दोन गुरूंनी अतिशय मोलाची साथ दिलेली आहे. त्यांचे पहिले शैक्षणिक गुरु एस. ए. टी. सब्जवारी हे आहेत. सब्जवारी यांनी कायद्याच्या क्षेत्रातील ५२ पुस्तके लिहिलेली आहेत. कायद्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. डॉ. विजेता सिंह यांना श्री सब्जवारी लेकी प्रमाणे वागवत असत. शिक्षणातील प्रगती पाहून सब्जवारी यांनी डॉ. विजेता सिंह यांना पीएचडी करण्याविषयी सल्ला दिला. सब्जवारी यांच्याकडे पीएचडी करण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असताना त्यांनी डॉ. विजेता सिंह यांना पहिली विद्यार्थिनी म्हणून पीएचडी करण्याचा एक प्रकारे सन्मानच दिला. त्यांच्या सन्मानाला सार्थ ठरवत अतिशय कष्ट करत डॉ. विजेता सिंह यांनी पीएचडी अवघ्या तीनच वर्षात पूर्ण केली. कायद्याच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातून वयाच्या २८ व्या वर्षी पीएचडी घेणाऱ्या डॉ. विजेता सिंह या पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या आहेत.

डॉ. विजेता सिंह यांचे दुसरे व्यावसायिक गुरु ऍड. प्रकाश बी पाटील हे आहेत. श्री पाटील यांच्याकडे डॉ. विजेता सिंह यांनी १८ महिने प्रॅक्टिस केली आहे. या १८ महिन्याच्या कालावधीत श्री पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट आणि आत्मीयतेने मार्गदर्शन केले. या १८ महिन्यातील त्यांनी दिलेली शिकवण पुढे आयुष्यभर उपयोगी पडेल इतकी मोलाची असल्याची भावना डॉ. विजेता सिंह यांनी व्यक्त केली आहे.

महाविद्यालयीन नोकरीची सुरुवात

मनियार विधी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. विजेता सिंह यांची गुणवत्ता तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रगती पाहून त्यांना महाविद्यालयाने सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर जॉब करण्यास बोलावले होते. २०१० मध्ये त्यांनी नेट ही परीक्षा पूर्ण केली त्याचवेळी संस्थेमध्ये ओपन कॅटेगरी ची जागा निघाली त्या जागेवर संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी डॉ. विजेता सिंह यांची नियुक्ती केली. या नियुक्ती बद्दल डॉ. सिंह म्हणतात, आजच्या काळामध्ये नंदकुमार बेंडाळे यांच्यासारख्या व्यक्ती समाजात आहेत यावर प्रथमता विश्वास बसत नाही कारण नोकरीसाठी भरभरून डोनेशन आणि पैसे मागितले जात असताना या संस्थेमध्ये केवळ गुणवत्तेला प्राधान्य देऊन नोकरी दिली जाते आणि याचा पायंडा प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी सुरू केलेला आहे. आजच्या काळामध्ये ही फार दुर्मिळ अशी गोष्ट आहे. या संस्थेमध्ये नोकरी सुरू करून आज बारा वर्षे पूर्ण झाले असून शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव जवळपास चौदा वर्षांचा डॉ. विजेता यांच्या पाठीशी आहे. २०१७ मध्ये त्यांना पीएचडीसाठी गाईडशिप मिळाली आहे.

आईचा भक्कम पाठिंबा

डॉ. विजेता राजपूत समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या समाजामध्ये अजूनही महिलांसाठी पारंपरिकता महत्त्वाची मानली गेली आहे. त्यामुळे महिलांचे शिक्षण फार दूरचा विषय आहे. मुलींना घराबाहेर देखील जाऊ दिले जात नाही. मात्र डॉ. विजेता यांच्या आई सुशीला सिंह यांचा दृष्टिकोन फार व्यापक स्वरूपाचा होता. त्यांनी डॉ. विजेता यांच्या शिक्षणाला पूर्णपणे पाठिंबा दिला. त्यांच्या पाठीशी आई खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्याचा परिणाम असा झाला की डॉ. विजेता या कायद्याच्या क्षेत्रामध्ये आघाडीचे व्यक्तिमत्व बनल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील कामगिरीचे सर्व श्रेय डॉ. विजेता आपल्या आईला देतात.

होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

समाजातील परिस्थितीचा अनुभव आणि अभ्यास पाठीशी असल्यामुळे डॉ. विजेता या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात नेहमीच देत असतात. Dedication decide your destiny या मंत्राचा उपयोग करत त्यांनी आतापर्यंत अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे घडविलेले आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या एक विद्यार्थी आता न्यायाधीश झालेला आहे. या विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची होती. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हा विद्यार्थी मिळेल ते काम करत होता. डॉ. विजेता यांनी त्याला योग्य मार्गदर्शन करून आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्यामुळे तो या पदावर पोचला आहे.

महिलांना कायद्याच्या शिक्षणासाठी प्रेरित केले

विधी महाविद्यालयामध्ये लीगल सेल उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी कायद्याविषयक मोफत सल्ला दिला जातो. डॉ. विजेता यांनी पाहिले की या ठिकाणी येणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार याचे प्रमाण सारखेच असल्याने दुसरीकडे या महिलांना कायद्याचा खर्च करणे परवडणारे नसल्याने त्यांनी अशा महिलांना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. डॉ. विजेता यांनी प्रेरित केलेल्या काही महिलांनी कायद्याची पदवी घेऊन स्वतःची न्यायालयीन लढाई लढली आहे.

पुस्तकाची रॉयल्टी सामाजिक संस्थेला

डॉ. विजेता यांचे सामाजिक भान अतिशय जागृत असल्यामुळे त्यांनी कायद्याविषयक लिहिलेल्या दोन पुस्तकांची रॉयल्टी एका सामाजिक संस्थेला दिलेली आहे. यातील पहिले पुस्तक कोविड काळामध्ये प्रसिद्ध झाले आहे. तीन जणांनी मिळून हे पुस्तक संपादित केलेले आहे. दुसरे पुस्तक १४ एप्रिल २०२१-२२ मध्ये प्रसिद्ध झाले. Social legal contribution of Dr Babasaheb Ambedkar या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते करण्यात आले होते. याशिवाय डॉक्टर विजेता यांचे ४५ शोधनिबंध प्रसिद्ध आहेत त्यांनी ५० च्या वर सेमिनार आणि कॉन्फरन्स मध्ये सहभाग नोंदवलेला आहे. याशिवाय २०० च्या वर टॉक शोमध्ये सहभाग तसेच आकाशवाणीवर १५ भाषणं प्रसिद्ध झालेले आहेत.

दोन विद्यार्थ्यांचे अनुभव कायम लक्षात

डॉ. विजेता यांनी अनेक विद्यार्थी घडविलेले आहेत मात्र दोन विद्यार्थ्यांचे अनुभव कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहिलेले आहेत. पहिला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या जळगाव आतील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा मोठा मुलगा पुण्यामध्ये लॉ चे शिक्षण घ्यायला गेला होता मात्र तेथे वाईट मार्गाला लागला आणि व्यसनी झाला. इतकेच नव्हे तर त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागले आणि वर्षभरासाठी तडीपार देखील व्हावे लागले. या मुलाला डॉक्टर विजेता यांच्याकडे आणण्यात आले. त्या मुलाच्या वडिलांनी डॉ. विजेता यांना सांगितले हा विद्यार्थी तुमचा लहान भाऊ आहे याला कसे घडवायचे तुम्ही ठरवा. डॉ. विजेता यांनी त्या विद्यार्थ्याचे मनोबल वाढवले नियमित अभ्यासाला लावले आणि त्याचा परिणाम असा झाला तो विद्यार्थी आज एक चांगला वकील म्हणून नावारूपाला आलेला आहे. मात्र दुर्दैवाने एका अपघातात या विद्यार्थ्याचे निधन झाले आहे.
दुसरा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, एका अपंग विद्यार्थ्याला नियमानुसार मदत करताना परीक्षेच्या वेळी या विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था खालच्या वर्गात केली होती. तेथे तो एकटाच विद्यार्थी असल्यामुळे त्याची अडचण होत होती. त्याला कुणाशी बोलता येत नव्हते. पहिल्या दिवशी त्यांनी पेपर दिला मात्र दुसऱ्या दिवशी स्वतःची जागा सोडून तो वरच्या मजल्यावर येऊन अन्य विद्यार्थ्यांबरोबर बसला. अशावेळी डॉ. विजेता यांनी त्याला विचारणा केल्यावर तो तेव्हा काहीच बोलला नाही मात्र दुसऱ्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये याविषयी बातमी प्रसिद्ध करून आणली. या गोष्टीचे डॉ. विजेता यांना आजही वाईट वाटते. कारण एका अपंग विद्यार्थ्याला मदत करण्याचे फळ त्यांच्या वाटेला अशा स्वरूपात आले आहे.

डॉ.विजेता या शिस्तबद्ध आहेत. चार विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत आहेत, पैकी दोन विद्यार्थ्यांची पीएचडी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. उच्च विद्याभूषित असलेल्या डॉ. विजेता या सामाजिक भान जोपासणाऱ्या कायद्याचा गाढा अभ्यास असलेल्या व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थी कायद्याचा अभ्यास घेऊन स्वतःची प्रगती करत आहेत.

दीपक जाधव,
संपादक : वास्तव पोस्ट
मोबाईल : ७२१८३६७३५६

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!