मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यभरात शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणारे असे लाखो विद्यार्थी आहेत, की जे आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने ये जा करत असतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना आता अ एसटी बसचे पास त्यांच्या कॉलेज तथा शाळेत वितरित करण्यात येतील. याबाबत तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
नवीन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शाळा आता सुरू झाल्या आहेत. घरा ते शाळेपर्यंत ये जा करण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना बसच्या पासमध्ये ६६ टक्के इतकी सवलत दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकूण रकमेच्या फक्त ३३ टक्के रक्कम भरून मासिक पास मिळतो. तसेच शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत म्हणजेच १०० टक्के सवलतीने एसटी पासचे वितरण केले जाते.
या शैक्षणिक वर्षापासून आता विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीचे पास केंद्रावर जाऊन पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाहीत. कारण आता विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्यांना पासचे वितरण करण्यात येईल. याबाबत १८ जून पासून एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
दरम्यान सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या पासधारक विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे.
