Home » महाराष्ट्र » माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला ! डोक्याला जबर दुखापत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला ! डोक्याला जबर दुखापत

नागपुर ( वास्तव पोस्ट ) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली असून या घटनेत अनिल देशमुख जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नरखेड येथील सांगता सभा आटपुन अनिल देशमुख तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगड फेकला. यात अनिल देशमुख यांच्या चार चाकी वाहनाचा समोरचा काच फुटला आणि त्याचे तुकडे आतल्या बाजूला उडाले त्यामुळे अनिल देशमुख जखमी झाले.

ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ ही घटना घडली. घटनेनंतर अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेवर भाजपा कडून प्रतिक्रिया आली असून अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा केला जात असला, तरी ही स्टंटबाजी असल्यास चा आरोप भाजप नेते आणि काटोल मतदारसंघ निवडणूक प्रमुख अविनाश ठाकरे यांनी केला आहे. केवळ सहानभुती मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नरखेड येथील सांगता सभा आटपुन काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत हल्ला केला. त्यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले. अनिल देशमुख यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांच्या गाडीसमोरील काचेवर एक मोठा दगड पडल्याचा दिसत आहे. गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे समोरील काच फुटली आणि त्या काचेचे तुकडे समोर बसलेल्या अनिल देशमुखांच्या डोक्याला लागले.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया…
पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!