T20 World Cup 2024 Final IND vs SA : २०२४ च्या T20 विश्वचषक मोहिमेत दोन्ही संघ अपराजित आहेत संपूर्ण स्पर्धेत या दोन्ही संघाला पराभवाचा एकही धक्का बलेला नाही. यामुळे आज विश्वचषक ट्रॉफीसाठी दोघांमध्ये “काँटे की टक्कर” बघायला मिळणार आहे.
बारबाडोस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज बारबाडोस येथे केन्सिंग्टन ओव्हलवर T-20 विश्वचषक स्पर्धेत विजेता पदासाठी आज हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:०० वाजता सामन्यास सुरवात होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ आता ICC T20 विश्वचषकामधील विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. या विजयासह टीम इंडियाची गेल्या १७ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आज संपुष्टात येणार का ? याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून आहे.
दरम्यान २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला T-20 विश्वचषक जिंकला होता. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने अद्याप एकही जेतेपद पटकावलेले नाही, त्यामुळे ते प्रथमच विश्वविजेते बनून इतिहास रचण्यास उत्सुक असतील. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात धडक मारेपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने आठपैकी सात जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दक्षिण आफ्रिकेने आठ पैकी आठ सामने जिंकून येथे मजल मारली आहे. अंतिम फेरीत पोहोचल्याने दक्षिण आफ्रिकेने “चोकर्स” हा टॅग काढून टाकला आहे.
दक्षिण आफ्रीका संघाविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माने केल्या आहेत. रोहितने १६ डावात ४२० धावा केल्या असून त्यात एक शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. तर या यादीत रोहितनंतर सूर्यकुमार यादवचा क्रमांक लागतो. सूर्या ने आतापर्यंत आफ्रिकेविरुद्ध केवळ ६ सामन्यात ६८.६ च्या उत्कृष्ट सरासरी आणि १७७.७२ च्या तूफानी स्ट्राइक रेटने ३४३ धावा चोपल्या असुन यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
दोन्ही संघातील T20 सामन्यात आजवरचे हेड-टू-हेड रेकॉर्ड बघितल्यास त्यात टीम इंडिया वरचढ आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघ याआधी एकूण २६ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यात टीम इंडियाने १४ सामन्यात विजय मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने ११सामने जिंकले आहेत आणि एक सामना पावसामुळे अनिर्णीत झाला आहे.
दोन्ही संघातील हेड-टू-हेड आणि या विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या प्रवासात दोन्ही संघ अपराजीत राहीले असले, तरी सध्याचा फॉर्म पाहता रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाच प्रबळ दावेदार मानली जात आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट असुन आईसीसी ने या सामन्यासाठी उद्याचा दिवस आणि १९० मिनिटं राखीव ठेवली आहेत, आणि तरीही अंतिम सामना पावसामुळे रद्द झालाच तर अशा परिस्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना स्पर्धेचे संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
