Dombivli Blast Fire : डोंबिवली MIDCत कंपनीला लागलेल्या भीषण आगीत कामगार आत अडकल्याच्या भीतीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतील ३० कंपन्या बंद करून अन्य भागात स्थलांतरित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : डोंबिवलीमध्ये एमआयडीसीत एका कारखान्यात स्पोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात स्फोटांचे मोठे आवाज येत असल्याची माहिती मिळत असुन या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंबिवली एमआयडीसीतील फेज २ मधील Indo Amines या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाले आहेत. सकाळीच लागलेल्या या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीचं स्वरूप अतिशय भीषण असुन आगीचे व धुराचे मोठे लोट दिसत आहेत. आग लागल्यानंतर कारखान्यातुन स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याने परिसरातील रहिवाशांची मोठी तारांबळ उडाली असुन त्यांच्यात अतिशय भीती निर्माण झाल्याचे दिसत आहे. या आगीचं स्वरूप अतिशय भीषण आहे. धुराचे काळेकुट्ट, मोठमोठे लोट उठताना दिसत आहेत. आगीच्या ठिकाणी पाच ते सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या युद्ध पातळीवर आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या कारखान्यात स्फोटामुळे अनेकजण अडकल्याचे सांगितले जात आहे. आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत. तर आजुबाजूला नागरिकांनीही याठिकाणी मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान गेल्या महिन्यात डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये स्फोट झाला होता. त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला होता. आता पुन्हा एका कंपनीमध्ये स्फोट झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
