सातारा ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी साताऱ्यातील दरेगाव येथे गेल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज दरेगाव इथे पत्रकार परिषद घेऊन जनतेकडून मिळालेल्या कौलाबद्दल मोठा खुलासा केला. निवडणुकीच्या धावपळीमुळे तब्बेत बिघडली होती. परंतु आता माझी प्रकृती आता बरी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी नेहमी गावी येत असतो. मी सीएम जरी होतो तरी एक कॉमन मॅन म्हणून काम केले आहे. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. मी लोकांमध्ये जाऊन काम केले. त्यामुळे मला माझ्या मुळगावी आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो. निवडणुकीच्या धावपळीमुळे तब्बेत बिघडली होती. रोज आठ, दहा सभा मी घेत होतो. आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद मिळतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पदाबद्दल मी माझा निर्णय आधीच स्पस्ट केला आहे. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेतील. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी काम केलं. अडीच वर्षांमध्ये आम्ही भरभरून काम केलं. मी देखील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला सर्व सामान्य लोकांना काय पाहिजे याची चांगली जाणीव आहे. त्यामुळे लोकही या सरकारला आपले लाडके सरकार म्हणतात.
राज्यात जे प्रकल्प रखडले होते, त्याला आम्ही चालना दिली. त्याबद्दल लोकांनी देखील आम्हाला कौल देऊन भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे लोकांची इच्छा आहे की मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा. कारण निवडणुका ह्या नेतृत्वात लढल्या गेल्या होत्या. परंतु मुख्यमंत्री निवडी संदर्भात भाजपा श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हटले.
