मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी २७६६ कोटींच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. दरड प्रतिबंधक, वीज कोसळण्यापासून प्रतिबंध, पूर संरक्षण भिंत, लहान पुलांचे काम, नाला खोलीकरण दुष्काळ निवारणासाठी भूजल पुनर्भरण, तलाव दुरुस्ती, वनीकरण आदी कामांचा यामध्ये समावेश आहे.
मंत्रालयातील राज्य आपत्कालिन प्रतिसाद केंद्राचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी अत्याधुनिक साधन सामुग्रींचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हाधिकारी यांना या केंद्राची कनेक्टिव्हिटी देखील दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आपत्कालिन प्रतिसाद केंद्राचे देखील अद्ययावतीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी उपस्थित होते.
