Home » महाराष्ट्र » नीलकमल बोट दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन

नीलकमल बोट दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीला नौदलाच्या बोटीने दिलेल्या धडकेत एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी आतापर्यंत १३ जणांना मृत घोषित केले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार मृतांमध्ये नौदलाचे ३ तर १० नागरिकांचा समावेश आहे. ३ गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एक ४ वर्षाची मुलगी आहे. एक ८ महिन्यांची गरोदर महिला आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे. नौदलाचा एक जवान देखील गंभीर असून उपचार घेत आहे.

प्रसंगाचे गांभिर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचावकार्यात नौदलाचे ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. अजूनही ८ क्राप्ट, १ कोस्टगार्ड वेसल आणि एका हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरुच आहे. दरम्यान मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

अपघातग्रस्त बोटीस धडक देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्पीड बोटचा चालक व इतर जबाबदार व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा क्र. ०२८३ दि. १८. १२. २०२४ रोजी भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम १०६ (१), १२५ (a), १२५ (b), २८२, ३२४ (३), ३२४ (५) प्रमाणे नोंदविण्यात आलेले आहेत. तसेच, अपघाताची Inland Vessels Act मधील सुरक्षितता व स्थिरता नियमांचे आणि संबंधित कायद्यांचे उल्लंघन प्रकरणी सर्वंकष चौकशी करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!