Headlines
Home » राजकीय » कॉंग्रेसच्या उत्कर्षा रूपवते तिकीटापासुन ‘वंचित’; प्रकाश आंबेडकारांची भेट घेतल्याने मविआमध्ये खळबळ

कॉंग्रेसच्या उत्कर्षा रूपवते तिकीटापासुन ‘वंचित’; प्रकाश आंबेडकारांची भेट घेतल्याने मविआमध्ये खळबळ

अहमदनगर | दि.३०( वास्तव पोस्ट न्यूज ) -लोकसभा २०२४ची धामधुम सर्वत्र सुरु झाली आहे. जवळपास प्रत्येक मतदार संघात राजकारण तापायला लागले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार होती. मात्र महाविकास आघाडीमध्ये शिर्डी हा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाला सुटल्याने उत्कर्षा रूपवते उमेदवारी पासून ‘वंचित’ रहावे लागले. आता मात्र रुपवते यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी समोर येत आहे. रुपवते यांचे तिकीट गेल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे लोकसभा निवडणूकीत उत्कर्षा रुपवते ह्या वंचितच्या तिकिटावर लढवणार असल्याची चर्चा शिर्डी मतदारसंघात सुरू झाल्या आहेत. या भेटीमुळे मात्र महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात बौद्ध समाजाचे मतदारांची संख्या जास्त असल्याने या मतदारसंघात बौद्ध उमेदवार मिळावा, अशी मागणी अनेक बौद्ध संघटनांनी केली आहे. तसेच बौद्ध समाजातील उत्कर्षा रुपवते देखील गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आयात भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निवडला असल्याची माहिती आहे. उत्कर्ष रुपवते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुक लढल्या तर मात्र महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी ही लढत जड जाणार आहे. वाकचौरे यांना मत विभाजनाचा फटका बसेल असे बोलले जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत न जाता वेगळी आघाडी निर्माण करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अनेकजण वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला पोहोचत आहेत. उत्कर्षा रुपवते यांनी बंडखोरी करत वंचितचा पर्याय निवडला तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहणार अशी जोरदार चर्चा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!