जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांचे वैभव मावळे लिखित आणि दिग्दर्शित प्रतिशोध या हिंदी नाटकाने राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी), नवी दिल्लीअंतर्गत होणार्या भारंगम या आंतरराष्ट्रीय महोत्सवात अक्षरश भुरळ घातली.
२८ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार्या महोत्सवात ४ फेब्रुवारी रोजी प्रतिशोध हे हिंदी नाटक सादर झाले. दरम्यान संपूर्ण खान्देशातून केवळ केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र या संस्थेच्या नाटकाची निवड झाली असल्याने लेखक-दिग्दर्शक वैभव मावळे यांच्यासोबत संपूर्ण चमूवर रंगकर्मीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यासाठी कान्ह ललित कला केंंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर अन् केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार जी. बेंडाळे व व्यवस्थापन मंडळाने विद्यार्थ्यांना केलेल्या कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी), नवी दिल्ली हे दरवर्षी भारंगम या नाट्य महोत्सवाचे आयोजन करीत असते. या नाट्य महोत्सवात महाराष्ट्र आणि भारत तसेच जभरातून निवडक नाटकांचे सादरीकरण होत असते. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय महोत्सवात आलेल्या नाटकांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या हॉलिवूड तसेच बॉलीवूडच्या लेखक,दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ व जाणकार प्रेक्षकांच्या समोर सादरीकरण होत असल्याने या महोत्सवाचे एक वेगळे प्रस्थ बनलेले आहे. याचा एक भाग म्हणून आपल्या जळगावचे प्रा. वैभव मावळे लिखित आणि दिग्दर्शित प्रतिशोध या नाटकाचे सादरीकरण खानदेशातील रथपरंपरेचे भवानी या कला प्रकाराच्या माध्यमातून नाटकाचे आगळे वेगळे सादरीकरण करण्यात आले.

खान्देशातील नामांकित अग्रगणी शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्राने खानदेशात सांस्कृतिक इतिहासात आता मानाचा तुरा रोवून खानदेशच्या लोककलेला एक मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. प्रतिशोध या नाटकाच्या निर्मितीमध्ये विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. हेमंत पाटील, दिनेश माळी यांनी मार्गदर्शन केले असून यासाठी कान्ह ललित कला केंद्राचे समन्वयक प्रा. प्रसाद देसाई यांनी संपूर्ण व्यवस्थापनाची तर किरणकुमार अडकमोल यांनी रंगभूषेची, सुदर्शन पाटील, सचिन महाजन यांनी वेशभूषेची बाजू सांभाळली तर या नाटकाच्या सादरीकरणासाठी आवश्यक असलेल्या पार्श्वसंगीतासाठी प्रा कपिल शिंगाने, देवेंद्र गुरव, सिद्धांत सोनवणे, जयेश वाणी, यांनी पारंपारिक वाद्याच्या साह्याने पार्श्व संगीताची बाजू सांभाळली तर सिद्धी कुलकर्णी हिने पार्श्वगायन केले, तर पार्श्वसंगीताचे तांत्रिक बाजू धनश्री शिंपी ने चोख पार पाडत विद्यार्थ्यांनी दमदार सादरीकरण केले.

या नाटकात लोकेश मोरे, यश चौधरी, विश्वजीत कोळी, यश कल्याणी, सचिन सोनवणे, गोपाल मोरे, उमेश चव्हाण, नैना अग्रवाल, ज्योती पाटील, अश्विनी बेलेकर, हिमांशी तायडे, हिमानी महाजन, यांनी साकारलेल्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. राष्ट्रीय नाट्य विद्यालयच्या निशा त्रिवेदी, मुस्कान गोस्वामी, सारिका पंडित यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन देत सहकार्य व मार्गदर्शन केले. नाटकाच्या सादरीकरणानंतर लेखक दिग्दर्शक वैभव मावळे व संघातील सर्व कलावंतांचा राष्ट्रीय नाट्यविद्यालयाकडून मानचिन्ह व प्रशासकीय पत्रके देऊ सन्मानित करण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय महोत्सवात अनेक देशांची नाटके सादर
जर्मनी, स्पेन, तैवान, श्रीलंका, पोलंड, ऑस्ट्रिया, नेपाळ या देशांचे सादरीकरण होणार असून यात भारतभरातून राज्यांमधून ओडिसा, कर्नाटक, नवी दिल्ली, मणिपूर, आसाम, बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुवाहाटी, पंजाब, गोवा, तेलंगणा, पटना, केरळ आणि जम्मू काश्मिर येथील नाटकांचे ही सादरीकरण झाले.
” राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्लीअंतर्गत भारंगम या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र, जळगाव येथील नाटकाचे सादरीकरण झाल्याने मनस्वी आनंद झाला, कान्ह ललित कला केंद्राने खानदेशाची पताका अशीच फडकत राहण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू व आगामी काळात देखील खान्देशचे सांस्कृतिक वैभव देशात व विदेशात देखील पोहोचवू …”
शशिकांत वडोदकर, संचालक कान्ह ललित कला केंद्र, जळगाव
