जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या महिन्यात आदर्श विद्यालय कुलगाव, बदलापुर जिल्हा ठाणे येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर पालक वर्गाची झोपच उडाली आहे. मुलींना शाळेत कसे पाठवायचे हा मोठा गंभीर प्रश्न पडला आहे. अशा लहान चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची कायदेशीर तपास प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्वरित फाशी देण्यात यावी व पीडित मुलींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना सादर करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष डॉ. शरीफ बागवान, शहर सचिव शब्बीर खान यांच्या हस्ते निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की, संपूर्ण जिल्हयातील शाळांमध्ये त्वरित मुलींच्या वर्गावर महिला शिक्षिकेची नेमणूक कण्यात यावी. व जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ज्या ठिकाणी सिसी टीव्ही कॅमेरे नाहीत अशा शाळेत तातडीने सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे. ज्या शाळेंमध्ये कॅमेरे नादुरुस्त असतील ते त्वरित दुरुस्ती करून कायम स्वरूपी चालू करावे. असे सक्तीचे आदेश काढुन त्याची अंमलबजावणी व्हावी जेणेकरून यापुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही. ज्या ज्या शाळा जिल्हाधिकारींचे आदेश मानणार नाही त्यांची शासकीय चौकशी करून अशा शाळांची मान्यता रद्द करावी.
