Home » जळगाव » पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी तत्काळ पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी तत्काळ पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील जलस्रोतांचा योग्य वापर करून, सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून आणि तांत्रिक अडथळे दूर करून नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचा निर्णय जिल्हा नियोजन भवनमध्ये महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाचा आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगावडे, मजीप्रा चे निकम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

■ महावितरण विभागाचा अहवाल

महावितरण विभागाला गेल्या पाच वर्षांत १५२० ट्रान्सफार्मर आणि अनुषंगिक कामांसाठी १११.४१ कोटींचा निधी वितरित केला आहे. मात्र, वाढत्या मागणीमुळे अधिक ट्रान्सफार्मर बसविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या निधीतून तालुकानिहाय कामे मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

■ पाणीपुरवठा योजनांमध्ये वीज जोडणीचा अडथळा

जिल्हा परिषदेच्या ४६२ पाणीपुरवठा योजना वीज जोडणीअभावी अद्याप अपूर्ण आहेत. यातील २८१ योजनांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून सादर करावे, असे आदेश पालकमंत्री यांनी दिले. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ११ ठिकाणी पाण्याचे स्रोत आणि १८ ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

■ शंभर दिवसांत १००टक्के नळजोडणीचे उद्दिष्ट

यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंता भोगवाडे यांनी १०० दिवस अभियानांतर्गत घरगुती नळ जोडणी १०० टक्के पूर्ण करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन तसेच पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महावितरण अधिक्षक अभियंता यांनी समन्वय साधून वीज जोडणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत असे निर्देश दिले.

■ सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यास गती

मेडा (MEDA)  विभागाने मंजूर केलेल्या २५ सौर प्रकल्पांपैकी १८ प्रकल्प भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले असले तरी, संबंधित शासकीय कार्यालयांनी वीज बिल न भरल्यामुळे नेट मीटरिंग प्रक्रियेत अडथळा आला आहे. त्यामुळे बिहाइंड द मीटर (Behind the Meter) प्रणाली लावून हे प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महावितरण, मेढा आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वय साधून २० मार्च पर्यंत ही कामे पूर्ण करावीत, असे आदेश देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!