मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शहराला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्री यांनी मुंबईकरांना आवाहन केले.
यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीष महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस. चहल, मुंबई महापालिका आयुक्त भुषण गगराणी उपस्थित होते.

दरम्यान मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या आहेत. एकाच वेळी एवढा पाऊस झाल्याने त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या होल्डींग पाँण्डस् मुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत असल्याचे सांगितले.
मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळे भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. पंपाने साचलेले पाणी समुद्रात टाकण्याची यंत्रणा करण्यात येत आहे. मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
