Home » महाराष्ट्र » पनवेल अपघातातील जखमींची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विचारपुस ; मृतांच्या कुटुंबाला ५ लाख मदत जाहीर

पनवेल अपघातातील जखमींची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विचारपुस ; मृतांच्या कुटुंबाला ५ लाख मदत जाहीर

पनवेल ( वास्तव पोस्ट न्यूज ) : डोंबिवली ग्रामीण येथून पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काल ट्रॅक्टर सोबत भीषण अपघात झाला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

यावेळी एमजीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता, डॉक्टर्स, शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, संतोष चव्हाण, शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण उपस्थित होते.

दरम्यान डोंबिवली ग्रामीण परिसरात राहणारे हे भाविक गेली २५ वर्षे आषाढी वारीनिमित पंढरपूरला जात होते. काल अचानक झालेल्या अपघातात ५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तर ७ प्रवासी हे गंभीररीत्या जखमी आहेत तर २३ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची डॉक्टरांकडून माहिती घेतली.

यासोबतच या दुर्घटनेत जीव गमवावा लागलेल्या प्रवाशांच्या कुटूंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर जखमी झालेल्यांवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच द्रुतगती महामार्गावर ट्रॅक्टर कसा आला याची चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!