Home » होम » निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी केला बिटकॉइनचा वापर ; नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप !

निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी केला बिटकॉइनचा वापर ; नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : आज महाराष्ट्राच्या विधानसभा २०२४ मतदानाला सुरुवात झाली असून काल संध्याकाळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर भाजपाकडून गंभीर आरोप केले. यात पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉईनचा वापर केल्याचा आरोप केला आहे.

भाजपाचे खासदार तथा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काल दि.१९ रोजी संध्याकाळी एक पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. तसेच पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट देखील पत्रकार परिषदेत सादर केले. सुप्रिया सुळे व नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे.

दरम्यान भाजपाच्या या आरोपांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सायबर क्राइमकडे ऑनलाईन तक्रार करून त्रिवेदी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी याबाबत एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यात सुप्रिया यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या सुधांशू त्रिवेदी यांनी केलेले आरोप निराधार आहेत. मात्र मला त्याचं आश्चर्य वाटत नाही कारण मतदानाच्या पूर्वसंथ्येला अशा प्रकारचे आरोप नेहमीच केले जातात. त्यांच्याकडून (भाजपा) अशा प्रकारे खोटी माहिती पसरवण्याचे प्रयत्न नेहमीच होतात. त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष न करता मी त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. माझे वकील त्यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी व दिवाणी खटला भरतील. आम्ही त्यांना तशी नोटीस बजावणार आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!