कोल्हापूर ( वास्तव पोस्ट ) : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्याहस्ते उत्तुर, आजरा येथील शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन उत्तूर/बहिरेवाडी, ता. आजरा जि. कोल्हापूर येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. १८७ कोटी रुपयांच्या निधीमधून पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय उभे राहणार आहे. तसेच बहिरेवाडी येथे महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाल्याचे त्यांनी कार्यक्रमात सांगितले. या कार्यक्रमाला आयुष संचालनालयाचे संचालक डॉ.रामन घुंगराळेकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान, विद्यापीठ नाशिकचे प्र.कुलगुरू मिलिंद निकुंभ, शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुरचे प्रशासकीय अधिकारी न.रा. पाटील, अधिष्ठाता डॉ.भाग्यश्री महावीर खोत, डॉ.वीणा पाटील, डॉ.आदर्श देसाई यांच्यासह उत्तुर व बहिरेवाडीचे सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, उत्तुर येथे १५ एकर जागेत निसर्गरम्य ठिकाणी एक चांगले महाविद्यालय सुरू होत आहे. याचा फायदा स्थानिकांना वैद्यकीय क्षेत्रात होणार आहे. तसेच याच महाविद्यालयाच्या शेजारी १०० प्रशिक्षणार्थी क्षमतेचे राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण रुपये २५२.०३५ कोटी इतक्या खर्चास मान्यता मिळाली आहे. शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुर अंतर्गत येणारे कॉलेज बहिरेवाडी येथील जे.पी.नाईक स्मारकाच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले असून या ठिकाणी पहिली तुकडी याचवर्षीपासून सुरू होत आहे. या इमारतीला १.५४ लक्ष रूपये दर महिना भाडेही शासनाकडून दिले जाणार आहे.
