मुंबई ( वास्तव पोस्ट ) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सीआयडी ताबडतोब कामाला लागले असून सरपंच हत्या प्रकरणात फरार आरोपींची बँक खाते सील करण्यात आली आहेत.
बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या जवळपास नऊ टीम कार्यरत आहेत. या सर्व टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडी अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमकडून सुमारे १०० हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे.
मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले :
सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवर आरोपींचे ठसे जुळल्याची माहिती मिळाली आहे. तसेच गाडीत फरार आरोपींचे मोबाईल देखील सापडले असून त्याचा तपास करण्यासाठी पथकाने संबंधित मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत. सापडलेल्या मोबाईल मध्ये मारहाण करतांनाचे व्हिडिओ, तसेच एका बड्या राजकीय व्यक्तिस कॉल केले असल्याची देखील माहीती मिळत आहे. मात्र यास सीआईडी कडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान फरार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयाकडे अर्ज देखील सीआयडी कडून दाखल करण्यात आले आहेत.
