Home » क्रीडा » ऑस्ट्रेलिया पुन्हा…! टीम इंडियाला हरवले अन् अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून १४० कोटी भारतीयांना रडवले

ऑस्ट्रेलिया पुन्हा…! टीम इंडियाला हरवले अन् अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून १४० कोटी भारतीयांना रडवले

वास्तव पोस्ट न्यूज़ l दि .११, आज खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र लक्षाचा पाठलाग करताना भारताच्या युवा टीमची चांगलीच पडझड झाली. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील २५४ हे सर्वात मोठं लक्ष्य होतं , ते पार करतांना ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या जेतेपदाच्या मार्गात पुन्हा एकदा आडवा आला.

सविस्तर वृत्त असे की दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनी येथे विलोमूर पार्क स्टेडियमवर आज सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागून होत्या. कारण आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर -19 चा अंतिम सामना खेळला जात होता. ह्या सामन्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते कारण नुकत्याच झालेल्या वरिष्ठ संघाच्या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाचा विजयी रथ ऑस्ट्रेलियाने अंतिम सामान्यात रोखुन दारुण पराभव केला होता. त्या आठवणी अजूनही ताज्या होत्या . आणि आज हिशेब चुकता होईल असे वाटत असतांनाच पुन्हा एकदा विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले आहे .क्रिकेट रसिक या पराभवामुळे अतिशय नाराज झालेत .

भारतीय डावाच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये कॅलम विडिलयरनं भारताचा सलामीवीर अर्शिन कुलकर्णीला अवघ्या तीन धावांवर बाद केलं. तिसऱ्या क्रमांकावर आलेला अष्टपैलू मुशीर खान २२ धावाच करू शकला , बिअर्डमननं त्याला बाद केलं. बिअर्डमननंच भारताचा कर्णधार उदय सहारनलाही ८ धावांवर खेळत असतांना बाद केलं. तर सचिन धस ९ धावांवर असताना मॅकमिलनच्या गोलंदाजीवर हिक्सला झेल देऊन माघारी परतला. प्रियांशू मोलिया ९ धावा तर अरावेली अविनाश आणि राज लिंबानी भोपळाही न फोडताच बाद झाले. या पडझडीत आदर्श सिंगची एकाकी झुंज बिअर्डमननंच मोडली. आदर्शनं ४७ धावा केल्या. अभिषेक मुरुगननं ४२ धावा केल्या.सौमी पांडे २ धावांवर बाद झाला तर नमन तिवारी १४ धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २५३ धावा केल्या. अंडर-19 विश्वचषकाच्या आजपर्यंतच्या अंतिम सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारताच्या राज लिंबानीने तिसऱ्या षटकामध्ये सॅम कॉन्स्टासचा त्रिफळा उडवून भारताला पहिले यश मिळवून दिलं. ऑस्ट्रेलियाने १६ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. पण हॅरी डिक्सननं ५६ चेंडूत ४२ धावा करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगनं ६४ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली तर ह्यू वाबगेननं ४८ आणि ऑलिव्हर पीकनं ४६ धावांच्या जोरावर ५० षटकात ७ बाद २५३ धावां केल्या.

भारतानं ऑस्ट्रेलियाला अंडर 19 विश्वचषकात २०१२ आणि २०१८ च्या फायनलमध्ये हरवलं होतं. भारतानं ही स्पर्धा पाचवेळा जिंकली आहे तर ऑस्ट्रेलियानं चारवेळा जिंकली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!