Home » राष्ट्रीय » अरविंद केजरीवाल यांच्या कालच्या जामिनावर आज स्थगिती; कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सुर

अरविंद केजरीवाल यांच्या कालच्या जामिनावर आज स्थगिती; कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सुर

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. या जामीन प्रकरणात ईडीने ४८ तास मागितले होते, मात्र राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडीची मागणी कालच फेटाळून लावली होती.

दरम्यान ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवालांच्या जामिनास विरोध दर्शविला. त्यानुसार आज दिल्ली उच्च न्यायालयाने राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या कालच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे अवघ्या २४ तासांच्या आत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साह तथा आनंदावर विरजण पडले आहे.

दिल्ली सरकारच्या रद्द झालेल्या अबकारी धोरणातून मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप ईडीकडून अरविंद केजरीवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीस सुधीर कुमार जैन आणि रवींद्र दुडेजा यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. “उच्च न्यायालय या प्रकरणाची दखल घेईपर्यंत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी होईपर्यंत सत्र न्यायालयासमोर (राऊस एव्हेन्यू) आता या प्रकरणाची सुनावणी होणार नाही”, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!